नवी दिल्ली I २०१२, २०१४, २०२२ मधील मंदी आणि २०१९ पासून घोंघावत असलेले कोरोनाचे सावट यामुळे जगभर महागाई, नोकर कपात, कर्जावरील वाढते व्याजदर अशा अनंत अडचणी सामान्य नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या. आर्थिक नाकेबंदी सारख्या कैक संकटांना तोंड देत अखेर साऱ्या जगाने २०२३ गाठले. नव्या वर्षाचे साऱ्या जगाने जल्लोषात स्वागत केले खरे पण, २०२३ धोक्याचे असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. एकंदरीत मंदीचा पाळणा हलला आहे, आणि आपापला नोकरी-धंदा सांभाळण्याचा बाका समय सर्वांसमोर येऊन ठेपला आहे, असाच संकेत नाणेनिधीच्या इशाऱ्यातून मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जगभरातील आर्थिक बाबी संदर्भात धक्कादायक विधान करताना म्हटले कि, २०२३ हे वर्ष गेल्या वर्षी पेक्षा “कठीण” असेल, कारण अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनच्या अर्थव्यवस्था मंदावतील. असे सूतोवाच जॉर्जिव्हा यांनी नववर्षारंभीच करून ठेवले आहे.
वाढत्या किमती, चढे व्याजदर, रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमध्ये कोविडचा वाढता प्रसार याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची २०२३ ची सुरुवात कठीण होणार आहे. कोविड धोरणामुळे चीन २०२२ मध्ये अर्थव्यवस्थेच्या सरासरीपेक्षा ४० वर्षांत प्रथमच, चीनची वाढ जागतिक वाढीच्या बरोबरीची किंवा कमी असेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. पुढील काही महिने चीनसाठी कठीण असतील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे.