मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे ‘काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार यावे यासाठी केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला. ब्लॅकमेल करुन भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे चोरांचे सरकार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.
मल्लिकार्जून खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच मुंबईत आले होते, त्यांचा मुंबई काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, पण तुम्ही कुठुन देता ? हे तर काँग्रेसने केलेले काम आहे. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसने दिला, रेशन दुकानांची व्यवस्था काँग्रेस सरकारनेच उभी केली. देशात अन्नांचा तुटवडा असायचा पण काँग्रेस सरकारने हरित क्रांती आणली, धवलक्रांती आणली म्हणून देशात धान्यांची गोदामे भरलेली आहेत. आज मोफत धान्य देत आहेत पण एके दिवशी मोदीजी हे मोफत धान्य सुद्धा बंद करतील.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाची स्थापना याच मुंबई शहरात झाली व येथून स्वातंत्र्याची मशाल देशभरात गेली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताकडे काहीच नव्हते पण पंडित जवाहरलाल नेहरुंच्या कुशल नेतृत्वामुळे देशाने प्रगती केली. पण आज केंद्रातील सत्ताधारी हे फक्त देश विकून देश चालवत आहेत. खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरु करताच दिल्लीतील सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच राहुलजी गांधी व पदयात्रेला भाजपा बदनाम करत आहे. आपले पुर्वज जसे इंग्रजांविरोधात लढले त्याच पद्धतीने आपल्याला आता भाजपाविरोधात लढायचे आहे. मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मागील काही वर्षापासून ती आपल्याकडे नाही पण पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आपण प्रयत्न करु.