बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फर्मान काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रामदूर्ग तालुक्यातील एका गावात विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, सध्याची कर्नाटक-महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा सल्ला दिला. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना निरोप दिला आहे.
बोम्मई यांनी सीमेपलीकडील जनता देखील आपलीच आहे, तेथील कन्नड शाळांचा विकास होत नाही. शाळांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही राज्यातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून सीमेपलीकडील कन्नड शाळांना अनुदान देण्यात येणार आहे. सीमेच्या आतील आणि सीमेपलीकडील शाळांसाठी १०० कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात येईल. तसेच सोलापूरमध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी मंजूर केले आहेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच महाराष्ट्रातील सीमेलगतच्या अनेक गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर हा वाद पुन्हा पेटला आहे.