नवी दिल्ली : ट्विटरमधील टाळेबंदीमुळे ट्विटर अजूनही चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता HP Inc या दिग्गज कंपनीने देखील Cost cutting चा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशभरात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या येत आहेत. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. त्यास Amazon, Meta देखील अपवाद नाहीत. एकुणात सातत्याने कमी होत चाललेली मागणी, वाढती महागाई, गुंडगिरी आणि राजकीय हस्तक्षेप याचा नकारात्मक परिणाम औद्योगिक व्यवस्था तसेच विकासावर होत आहे.
संगणक आणि प्रिंटर निर्माता HP Inc ने सांगितले की, कंपनी येत्या ३ वर्षात ४००० ते ६००० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत HP मध्ये सुमारे ५१,००० कर्मचारी होते. २०१९ मध्ये HP ने ७ हजार ते ९ हजार कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेतला गेला आहे. HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जात आहे. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला. चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली असून, ती एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $ १४.८ अब्ज नोंदवली गेली होती.
HP Inc. चे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटले की, अस्थिर मॅक्रो वातावरण आणि मागणी कमी झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये मंदीची भीती अधिक गडद होत आहे हेच HP Inc ची टाळेबंदी सूचित करते. वाढते व्याजदर आणि वाढत्या महागाईच्या काळात Amazon, Meta, Twitter सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी टाळेबंदीचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, HP ने डेस्कटॉप विक्री देखील टाळण्याचे नमूद केले आहे. यामुळे पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांसमोर अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. HP च्या संगणक विभागाच्या विक्रीत चौथ्या तिमाहीत १३ टक्के घट झाली असून ती १०.३ अब्ज डॉलरवर आली आहे. परिणामी कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात २५ टक्क्यांची घट झाली आहे.