‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात चुरशीचा सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १-० असा जिंकत विश्वचषकाची विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्युकने पहिल्याच हाफमध्ये २३ व्या मिनिटाला गोल केला. विशेष म्हणजे या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेमध्ये तीन वेगवेगळ्या खंडातील संघांना पराभूत करणारा तिसरा संघ ठरला आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांचा वेगवेगळ्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी पराभव केला, हे उल्लेखनीय ठरावे. यापूर्वी अशी कामगिरी इराण आणि अल्जेरियाने केली होती. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने १९७४ नंतर पहिल्यांंदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल खाल्ला नाही.
पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळाली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ड्युकने २३ व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला आणि गोलचे खाते उघडले. पहिल्याच हाफच्या सुरूवातीलाच ट्युनिशियाने गोल खाल्याने त्यांनी या गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार खेळ करण्यास सुरूवात केली. ट्युनिशियाने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर चढाई सुरू केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीने आपल्या गोलपोस्टचा जबरदस्त बचाव केला.
दुसऱ्या हाफमध्ये देखील ट्युनिशियाने पासिंग आणि बॉल पझेशनच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा सरस खेळी केली. याचबरोबर ट्युनिशियाने सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर १४ वेळा हल्ला चढवला. मात्र त्यातील फक्त ४ शॉट्सच अचूक होते. याउलट ऑस्ट्रेलियाने ९ शॉट्सपैकी २ शॉट्सच अचूक मारले. त्यातील एक गोलमध्ये रुपांतरित झाला. पहिल्याच हाफमध्ये गोल झाल्यानंतर ट्युनिशियाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ करतानाचा धसमुसळा खेळ देखील केला. त्यामुळे ट्युनिशियाला तीन यलो कार्ड मिळाले.