गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे.
आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना डोळ्यासमोर ठेवून २० लाख तरुणांना रोजगार, एम्स स्तरावरील २ संस्थांची स्थापना आणि १० लाखांचा आरोग्य विमा यासह अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (शनिवार) गांधीनगर येथील प्रदेश कार्यालयात हे ठराव पत्र जारी केले. यावेळी जेपी नड्डा म्हणाले, ‘गुजरात ही संतांची भूमी आहे. भाजप सरकार जे सांगते तेच करते. आम्ही संविधानाचे पालन करत असतो. आमच्या या संकल्प पत्राने गुजरातचा नक्की विकास होईल.’
सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत ‘सिंचन योजना’ पुढे नेण्यासाठी आम्ही २५ हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यासह आम्ही दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये २ सी फूड पार्क उभारणार आहोत, असेही नड्डांनी जाहीर केले.
भाजपच्या संकल्प पत्रात मोठी आश्वासने
भाजपच्या संकल्प पत्रानुसार, आयुष्मान भारत योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आता १० लाख करण्यात येणार आहे. पुढील ५ वर्षात गुजरातमधील तरुणांना २० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच १०,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये २०,००० सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केले जाईल. ३ सिव्हिल मेडिसिटी, AIIMS स्तरावरील २ संस्था, विद्यमान रुग्णालये, CHC आणि PHC च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १०,००० कोटी रुपयांचा महाराजा श्री भागवत सिंह स्वास्थ्य कोष तयार केला जाणार आहे.