मेक्सिको : अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका चिमुकलीला जन्मताच सहा सेंटीमीटरचे शेपूट असल्याचे आढळले. हा अजब प्रकार पाहून डॉक्टर्सही हैराण झाले आहेत. अमेरिकेतील ही अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर- पूर्व मेक्सिकोतील Nuevo Leon राज्यातील एका ग्रामीण रुग्णालयात या अनोख्या चिमुकल्या मुलीचा जन्म झाला. तेव्हा डॉक्टरांना मुलीला एक शेपुट असल्याचे लक्षात आले. हे शेपुट ५.७ सेंटीमीटर व रुंदी ३ ते ४ मिमि या आकाराचे होते. तर, या शेपटीला थोडे थोडे केस अर्थात लव देखील होते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे, अशी माहिती ‘डेली मेल’ ने दिली आहे.
जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी मध्ये याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. चिमुकलीची आई जेव्हा गरोदर होती तेव्हा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. तिच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये कोणताही संसर्ग आणि रेडिएशनचा इतिहास नाही. त्यांना आधीही एक मुलगा झाला, तो स्वस्थ आहे. मात्र, मुलीला जन्मतःच शेपुट असल्याने डॉक्टरही थक्क झाले.
शेपटी आढळल्यानंतर मुलीची तपासणी करण्यात आली. तेव्हा तो केवळ मांसाचा गोळा असल्याचे समोर आले. तिथे एकही हाड नव्हते. शेपटी मऊ आणि त्वचेने झाकलेली होती आणि त्यावर हलके लव होते, असे निरीक्षण पोलिस अधिकाऱ्यानी नोंदवले आहे.