नवी दिल्ली : प्रतिनिधी
Poverty eradication | जागतिक बँकेच्या नव्या अहवालानुसार, भारताने मागील ११ वर्षांत (२०११ ते २०२२) २७ कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीमधून बाहेर काढले आहे. हे भारताचे मोठे यश मानले जात आहे.

भारताने गरिबीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या काळात गरीबी दर २७.१ टक्क्यांवरून घटून फक्त ५.३ टक्के इतका झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात समान प्रमाणात गरिबी कमी झाली असून यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांचा विशेष वाटा आहे.
जागतिक बँकेनुसार जे लोक दररोज ३ डॉलर (सुमारे २५० रूपयांपेक्षा) पेक्षा कमी खर्च करू शकतात, त्यांना अत्यंत गरीब मानले जाते. याच मोजमापानुसार २०११ मध्ये देशात २७ टक्के लोक अत्यंत गरीब होते. २०२२ मध्ये हे प्रमाण केवळ ५.३ टक्के राहिले आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये जास्त गरीब लोक होते. या राज्यांनी गरिबी कमी करण्यामध्ये मोठे योगदान दिले. या पाच राज्यांत २०११-१२ मध्ये देशातील ६५ टक्के अत्यंत गरीब लोक राहत होते. या राज्यांनी गरिबी हटवण्याच्या एकूण प्रगतीत दोन तृतीयांश योगदान दिले आहे.