संभाजीनगर : प्रतिनिधी
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याभोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हॉटेल विट्स लिलाव वादाच्या सावटातून अजून सावरत नाहीत, तोवर आता माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी पालकमंत्र्यांचे सुपुत्र यांच्या मालकीची असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. या भूखंडासाठी पूर्वी ट्रक टर्मिनलचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण हटवून ही जागा मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली असलेल्या कंपनीला प्रत्यक्षात अल्कोहोल युनिट सुरू करण्यासाठी जागा देण्यात आल्याचा हा प्रकार गंभीर असून, यामागे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा संशय नाकारता येणार नाही, अशी टीका जलील यांनी केली. शासनाने या प्रकरणात पारदर्शकता दाखवून दोषींवर करावी, अशी मागणी जलील यांनी पत्रकार परिषदेतून केली.