Special Story
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध ३ वर्षापासून सुरू आहे. त्यातच अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. २०२३ साली व्हिक्टोरिया रोशचिना नावाची महिला पत्रकार जी जापोरिज्जिया येथे युक्रेनी नागरिकांना अवैधपणे ताब्यात घेणे, त्यांच्या यातना या विषयावर रिपोर्टिंग करत होती. तिचा भयावह अंत झाल्याचे आता उघड झाले आहे. रशियाने जणू पत्रकारांविरूद्ध युद्ध पुकारले अशी स्थिती निदर्शनास येत असून आतापर्यंत ९ महिला पत्रकार बळी पडल्या आहेत. व्हिक्टोरिया ही रशियन छळाला बळी पडलेली नववी महिला पत्रकार ठरली आहे.

२७ वर्षीय व्हिक्टोरियाला रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. कित्येक महिने तिचा क्रूरतेने छळ केला. व्हिक्टोरियाचा मृतदेह युक्रेनच्या ताब्यात दिला तेव्हा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये व्हिक्टोरियासोबत भयंकर छळ आणि अमानुष अत्याचार झाल्याच्या खूणा आढळल्याचे निदर्शनास आले.

व्हिक्टोरियाच्या शरीरावर खरचटलेल्या खूणा होत्या, हाडे मोडली होती. गळ्यावर खोलवर जखमा होत्या, पायावर इलेक्ट्रिक शॉक दिल्याचेही दिसून आले. या पेक्षाही अधिक हैराण करणारे म्हणजे व्हिक्टोरियाचा मेंदू, डोळे आणि श्वसननलिका गायब आहे. व्हिक्टोरिया यूक्रेनची पत्रकार होती. ती दीर्घकाळापासून रशियाने कब्जा केलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग करत होती.
व्हिक्टोरिया रोशचिना ही युद्धातील एक पीडिता नव्हती तर युक्रेनमधील सर्वात निडर पत्रकार होती. ती रशियाने अवैधपणे कब्जा केलेल्या युक्रेनी भागात जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत जगासमोर सत्य आणत होती. सीक्रेट स्थळी जात तिथले काळे वास्तव समोर आणणे, नागरिकांचा छळ जगाला दाखवणे हे ती करत होती.
फेब्रुवारी २०२५ साली कैद्याच्या अदलाबदलीवेळी व्हिक्टोरिया रोशचिनाचा मृतदेह रशियाने युक्रेनला सोपवला. तिचा मृतदेह अज्ञात पुरूष म्हणून दिला होता परंतु डिएनए चाचणीत तिची ओळख पटली. व्हिक्टोरियाचा मृत्यू रशियाच्या ताब्यात असताना झाला, त्याचे पुरावे मिळाले आहेत. रशियन कारवाईचा हा एक पॅटर्न असल्याचे या निमित्ताने समोर आले. पत्रकारांसाठी इथले ग्राऊंड रिपोर्टिंग करणे जीवघेणे काम झाले आहे. तरीही सत्य समोर आणण्यासाठी पत्रकार प्रत्येक दिवशी हा धोका पत्करत आहेत.