बीड : प्रतिनिधी
बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला आहे. शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकून आहेत. वर्षभरापासून फरार असलेल्या अर्चना कुटेला अटक होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. याचे पडसाद काही दिवसांपूर्वी सभागृहात देखील पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असे आश्वासन दिले होते. आता त्याच अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेला हा तपास सीआयडी कडे वर्ग झाला आहे. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे मागील वर्षभरापासून फरार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठेवीदारांची झूम मीटिंग देखील घेतली होती. मात्र तरी देखील तपास यंत्रणेला अर्चना कुटे का मिळून येत नाहीत? असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला होता. आता तपास सीआयडीकडे वर्ग झाल्याने अर्चना कुटेला अटक होणार का? याकडेच लक्ष असणार आहे.