हैदराबाद : News Network
शनिवारी रात्री ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने हैदराबादेत एका सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याला ‘एआयएमआयएम’नेही पाठिंबा दिला. दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी ब्लॅकआउट निषेध करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

या ब्लॅकआऊट दरम्यान रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येतील. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित वक्फ वाचवा, संविधान वाचवा जाहीर सभेत, ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेत १८ मे रोजी शहर पातळीवर राउंड-टेबल मीटिंग आयोजित करण्याचा आणि नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये अशाच बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मे रोजी हैदराबादमधील ईदगाह बिलाली हॉकी ग्राउंडवर महिलांच्या सभेचे आयोजन केले जाईल. यानंतर, २५ मे रोजी हैदराबादमध्ये दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत मानवी साखळी करून निषेध करण्यात येईल आणि १ जून रोजी धरणे दिले जाईल. याशिवाय, स्थानिक नेतृत्वाशी सल्लामसलत करून आंध्र आणि तेलंगणा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सभा घेतल्या जातील, अशी घोषणाही एआयएमपीएलबी नेतृत्वाने रविवारी केली.