बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. घडलेल्या प्रकाराचे फोटोही व्हायरल झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


मायग्रेनचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील लाऊड स्पीकर आणि पीठाची गिरणी हटविण्यात यावी, अशी मागणी करत महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले. तिला लाठ्या-काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली.
ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला कोणीही मारहाण केलेली नाही. उलट तीच गावातील लोकांना त्रास द्यायची. ज्ञानेश्वरीला तिच्या घरच्यांनीच मारहाण केली, असा दावा गावक-यांनी केला आहे. ज्ञानेश्वरी अंजान हिने सेनगाव येथील सरपंचासह १० जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे नातेवाईक आणि गावक-यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अॅड. ज्ञानेश्वरी अंजान हिने गावक-यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती देखील गावक-यांनी दिली आहे.
वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे, असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.