न्यूयॉर्क : News Network
सध्या अमेरिकेत लोक मॉल आणि दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. कपडे, किराणा सामान फर्निचरपासून उपकरणे आणि दारूपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे घाबरलेल्या लोकांच्या मनात महागाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोक किमती वाढण्यापूर्वी वस्तू खरेदी करुन साठवण्यास भर देत आहेत. टॅरिफमुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे, असेही अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात तेजी : महागाईच्या भितीने अमेरिकन लोक फक्त गरजेच्या वस्तूच नाही तर वाहनेही खरेदी करत आहेत. कारण ट्रम्प यांनी परदेशी वाहने आणि ऑटो पार्ट्सवर २५ टक्के दर लागू करण्याची घोषणा करताच लोकांची गर्दी झाली. हा दर ३ एप्रिलपासून लागू झाला आहे.
आयातीवर किमान १० टक्के शुल्क
काही गोष्टी खरेदी करून ठेवणे शहाणपणाचे असले तरी अधिक साठा करताना कर्जापासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेने सर्व देशांमधून आयातीवर १० टक्के बेसलाइन टॅरिफ लागू केले आहे. याशिवाय अमेरिकेने आपल्या ६० हून अधिक व्यापार भागीदारांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे, जी ९ एप्रिलपासून लागू होणार आहे.