कोची : News Network
केरळमधील कोची शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेरुम्बावूर येथील एका खाजगी कंपनीत कर्मचा-याला एवढी वाईट वागणूक देण्यात आली आहे की, कुणाचाही संताप उडेल. या कर्मचा-याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून कार्यालयात गुडघ्यांवर फिरवण्यात आले. त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी देऊन ते कुत्र्याप्रमाणेच पिण्यास भाग पाडले गेले. एवढेच नाही, तर त्याला त्याचे कपडे काढून मारहाणही करण्यात आली. हे सर्व संबंधित कर्मचा-याच्या खराब परफॉर्मन्समुळे (टार्गेट पूर्ण न केल्यामुळे) शिक्षा म्हणून करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी यासंदर्भात अहवाल मागवला आहे. ते म्हणाले, केरळमध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे केली जाते. कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा छळ सहन केला जाणार नाही. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
घरोघरी जाऊन वस्तू विकते कंपनी : एर्नाकुलम विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घटना घडलेल्या घराचा पत्ता मिळाला आहे. हे घर पेरुम्बावूरमधील अराक्कापदी येथे आहे. अधिका-यांच्या मते, ही एक सेल्स कंपनी आहे. जी केरळमध्ये घरोघरी जाऊन वस्तूंची विक्री करते. सुरुवातीच्या तपासात दिसून आले आहे की, संबंधित कंपनीत गेल्या तीन महिन्यांपासून एकही पुरुष कर्मचारी नाही. तेथे केवळ महिला कर्मचारीच कार्यरत आहेत. अधिकारी या सर्व महिला कर्मचा-यांशी बोलत आहेत.
कंपनीविरुद्ध चौकशी सुरू : या घटनेसंदर्भात कामगार अधिका-यांनी संबंधित व्हिडिओमध्ये दिसणा-या एका तरुणाची चौकशी केली. यात, हा व्हिडिओ एका कर्मचा-याने बनवला आहे. तो कर्मचारी व्यसनी होता आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असल्याचे, त्या तरुणाने सांगितले. पोलिसांनी पलारीवट्टोम येथील कंपनीच्या कार्यालयाची तपासणी केली.
खराब परफॉर्मन्समुळे शिक्षा : कर्मचा-याचा परफॉर्मन्स खराब होता म्हणून त्याला शिक्षा देण्यात आल्यचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कर्मचा-याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर चालवले गेले. त्याला काही कॉइन्स जमिनीवर टाकून ते चाटण्यास सांगण्यात आले. तसेच, त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी भरून कुत्र्यासारखेच प्यायलाही भाग पाडले गेले.