लंडन : News Network
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. थायलंडमधील ज्या हॉटेलच्या खोलीत शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता तेथून एक बेकायदेशीर औषध हटविण्यात आले होते. या औषधाचा वॉर्नच्या मृत्यूमध्ये मोठा वाटा असू शकतो; परंतू याची नोंद पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नाही, असा दावा ब्रिटनमधील Daily Mail ने केला आहे. या दाव्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, शेन वॉर्नच्या मृतदेहाजवळ ‘कामाग्रा’ (Kamagra) नावाचे औषध आढळले. हे औषध व्हायग्रासारखे मानले जाते. थायलंडमधील एका पोलीस अधिका-याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, तपास पथकाला शेन वॉर्नचे वास्तव्य असणा-या हॉटेलच्या खोलीतील औषधाची बाटली काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिका-यांनी ती बाटली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे आदेश अगदी वरच्या पातळीवरून येत होते. शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत कोणताही वादग्रस्त मुद्दा उद्भवू नये अशी त्यांची इच्छा असावी.
‘कामाग्रा’ हे औषध थायलंडमध्ये बेकायदेशीर आहे. ज्यांना हृदयरोग आहे त्यांच्यासाठी हे औषध विशेषत: धोकादायक मानले जाते. शेन वॉर्नचा मृत्यू झालेल्या खोलीत उलट्या आणि रक्ताचे डाग असल्याचेही अहवालात म्हटले आहे, परंतु अधिका-यांनी आदेशानुसार औषधाची बाटली काढून टाकली होती. कामाग्रा औषधाची पुष्टी करण्यासाठी कोणीही बाहेर येणार नाही, कारण तो एक संवेदनशील विषय आहे. या सर्वामागे अनेक शक्तिशाली अदृश्य हात होते, असा दावाही संबंधित अधिका-याने केला आहे.