ऍम्स्टरडॅम : News Network
नेदरलँडमध्ये राहणा-या एका १७ वर्षीय मुलाला फुटबॉल खेळताना गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु भूल (ऍनेस्थेसिया) उतरल्यावर मुलाने फक्त इंग्रजी भाषेत बोलायला सुरुवात केली आणि तो आपण अमेरिकेतील असल्याचा दावा करू लागला.

विशेष म्हणजे, यापूर्वी तो इंग्रजी फक्त शाळेच्या तासांमध्ये शिकला होता. रुग्णाला त्याच्या आई-वडिलांची ओळख पटत नव्हती आणि तो डच (त्याची मूळ भाषा) समजू शकत नव्हता, तसेच ती बोलूही शकत नव्हता.
डॉक्टरांच्या अहवालानुसार, त्याला कोणतीही मानसिक आजाराची पूर्वपीठिका नव्हती. सुरुवातीला त्याच्या परिचारिकेला वाटले की हे भूल उतरल्यावर येणारे भ्रमिष्टपणाचे लक्षण असावे, कारण काही वेळासाठी रुग्णांना अशा प्रकारचा गोंधळ होऊ शकतो. मात्र, काही तास उलटल्यानंतरही तो एकही शब्द डचमध्ये बोलू शकला नाही, त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मानसोपचार पथकाने तपासणी केल्यानंतर आढळले की, रुग्ण शांत होता आणि प्रश्नांना उत्तर देत होता, पण फक्त इंग्रजीतच! काही वेळाने तो डचमध्ये छोटी छोटी वाक्ये बोलू लागला, पण त्याला ते खूप कठीण जात होते.
शेवटी, डॉक्टरांनी त्याला फॉरेन लँग्वेज सिंड्रोम हा दुर्मीळ आजार झाल्याचे निदान केले. हा एक असा विकार आहे, ज्यामध्ये रुग्ण अचानक आपल्या मूळ भाषेऐवजी दुस-या भाषेत बोलायला लागतो. त्याची न्यूरोलॉजिकल तपासणी केली, पण त्यात काहीही अनियमितता आढळली नाही. शस्त्रक्रियेनंतर १८ तासांनी त्याला डच भाषा समजू लागली. मात्र, त्याच्या काही मित्रांनी भेट दिल्यावर अचानक त्याला पुन्हा डच बोलता येऊ लागले!