न्यूयॉर्क : News Network
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, रेसिप्रोकल टॅरिफ याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारचा दिवस संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांसाठी चांगला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार कोसळल्याचे मानले जात आहे. या विधानानंतर एकीकडे अमेरिकेचा डाऊ ९०० अंकांनी घसरला असून ४ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला, तर दुसरीकडे Nasdaq मध्ये अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली, यातून भारतीय शेअर बाजारही सुटला नाही.

अमेरिकेतील प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘संडे मॉर्निंग फ्यूचर्स विथ मारिया बार्टिरोमो’ मध्ये राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. ट्रम्प म्हणाले, की अमेरिकेची अर्थव्यवस्था संक्रमणातून जाण्याची शक्यता असून मंदीची शक्यता नाकारता येत नाही. Trump यांना या वर्षी मंदीची अपेक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला ट्रम्प यांनी उत्तर दिले, मला अशा गोष्टींचा अंदाज वर्तवायला आवडत नाही. परंतु, आम्ही जे करत आहोत ते खूप मोठे आहे, त्यामुळे हा संक्रमणाचा काळ आहे. या वक्तव्यानंतर गुंतवणूकदार चिंतीत झाले आणि त्याचे पडसाद शेअर बाजारात पाहायला मिळाले.
भारतीयांना ३ लाख कोटींचा फटका
भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे Market Cap साधारणपणे ३९०.९१ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ३९३.८५ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे २.९४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.