जेजुरी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणा-या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरूष सारे बुद्धू… पण का?? जाणून घेण्यासाठी वाचा….
फॅशन म्हणून वापरण्यात येणा-या फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते म्हणाले की, मंदिराचे पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.