नांदेड/पुणे : News Network
तब्बल ६,६०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणात मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरु या शहरांमध्ये तब्बल ६० ठिकाणी धाड टाकली. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात गेन बिटकॉईन कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ६,६०० कोटी रुपये इतकी आहे. मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीची स्थापना अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांनी २०१५ मध्ये केली होती.

या कंपनीच्या गेन बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवणारी योजना सुरु करण्यात आली होती. २०१७ मध्ये याप्रकरणात नांदेडमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेडमधील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली होती.
सुरुवातीला या कंपनीने गुंतवणुकदारांना महिन्याला १० टक्के व्याजाने परतावा दिला. त्यामुळे अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले होते. एकट्या नांदेड जिल्ह्यात गेन बिटकॉईनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. गेन बिटकॉईनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज याने नांदेडमध्ये शिक्षण घेतले होते. त्याने अनेकांना महिन्याला १० टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून गेन बिटकॉईन हे सॉफ्टवेअर अनेकांना दिले होते.
सुरुवातीच्या काही महिन्यांत गेन बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला. मात्र, नंतरच्या काळात अमित भारद्वाज याने गुंतवणुकदारांची फसवणूक केली आणि तो दुबईला पळून गेला. त्याच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊन त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी त्याचा मृत्यू झाला.