सुरत : विशेष प्रतिनिधी गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण या गावातील आजी-आजोबांनीही लव्ह मॅरेज केलेलं आहे. त्याममुळे त्यांना लव्ह मॅरेजबद्दल काहीच वावगं वाटत नाही.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आपल्याच गावातील मुला मुलींना गावातच प्रेम विवाह करण्याची आमच्या गावची परंपरा आहे. ही परंपरा आजकालची नाही. गेल्या दोन तीन पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे. आम्हाला या परंपरेचा अभिमान आहे. तसेच या गावातील लोक गावाच्या बाहेर लग्न करत नाही. म्हणजे बाहेरच्या गावातील मुला किंवा मुलीशी लग्न करत नाहीत. आपल्याच गावातील मुला, मुलींशी विवाह करतात.
प्रेमातून निर्माण झालेलं नातं अत्यंत मजबूत असतं असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या गावातील लोक आपला जीवन साथी स्वत: निवडतात. या गावातील होणारी लग्नही इतर गावांपेक्षा वेगळीच असतात. कारण लव्ह मॅरेजच्या निर्णयात घरातील लोक हस्तक्षेप करत नाही. त्यांना तशी गरजही पडत नाही.
या शिवाय गावातील लोक नात्याला पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. मुलगा आणि मुलगी जर एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं कुटुंबाचं म्हणणं असतं. या गावातील बुजुर्ग सुद्धा आपली मुलं आणि नातवांच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. त्यामुळेच नाती मजबूत असतात. परिणामी घटस्फोट घेण्याचं आणि महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही अत्यंत कमी आहे.