नवी दिल्ली : khabarbat News Network

भारतीय संरक्षण उद्योगाचे क्षेत्र सातत्याने विस्तारताना दिसत आहे. फिलीपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकल्यानंतर, आता एका भारतीय कंपनीने थेट अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार केला आहे. या करारांतर्गत आता अमेरिकेला आधुनिक तोफा पुरवल्या जाणार आहेत.
भारत फोर्जची उपकंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेडने (kssl) मेड-इन-इंडिया अॅडव्हन्स्ड आर्टिलरी तोफांच्या पुरवठ्यासाठी यूएस-स्थित एएम जनरल सोबत लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर स्वाक्षरी केली आहे. हा करार संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे झाला. जो संरक्षण उद्योगासाठी एक मैलाचा दगड आहे. भारत अमेरिकेला पहिल्यांदाच अत्याधुनिक तोफांचा पुरवठा करत आहे.
अबू धाबी येथे संबंधित दोन कंपन्यांमध्ये हा करार झाला. या करारानंतर, भारत फोर्जचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर बाबा कल्याणी म्हणाले, हे आमच्या तांत्रिक क्षमतेचे प्रमाण आहे आणि तोफांच्या बाबतीत जागतिक नेता बनण्याच्या ध्येयाकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे.