टोरॅँटो : News Network
कॅनडामध्ये झालेल्या एका मोठ्या विचित्र विमान अपघाताबाबतची थरारक माहिती समोर आली आहे. टोरॅँटोमधील (Toronto) पियर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान उतरताना उताणे पडून दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान धावपट्टीवर घसरले आणि उलटे-पालटे घरंगळत अखेर उताणे पडले. (plane crash in toronto)

विमानतळ प्रशासनाने सांगितले की, (Canada) मिनियापोलिस येथून येत असलेल्या डेल्टा फ्लाइटसोबत ही दुर्घटना घडली. या विमानामधून ७६ प्रवासी आणि चालक दलाचे ४ कर्मचारी प्रवास करत होते. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी घडली.

दरम्यान, अपघातानंतरचे घटनास्थळाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मित्सुबिशी सीआरजे-९०० एलआर विमान धावपट्टीच्या बर्फाने आच्छादलेल्या पृष्टभागावर उलटे पडलेले दिसत आहे. तर आपातकालिन कर्मचारी विमानावर पाण्याचा मारा करताना दिसत आहेत. अपघातादरम्यान टोरांटोमध्ये आलेल्या हिमवादळामुळे विमान काही प्रमाणात झाकोळलेले दिसत आहे. विमानामधील सर्व प्रवासी आणि चालक दलाचा शोध लागला आहे, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.