वडीगोद्री (जालना) : प्रतिनिधी

अंतरवली सराटी येथे उद्या, १५ फेब्रुवारीपासून सुरू होणारे उपोषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी लांबणीवर टाकले आहे. हे उपोषण दहा-पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलल्याची घोषणा जरांगे यांनी आज (शुक्रवारी) केली. ते अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.
जरांगे पुढे म्हणाले, उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती, त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याचे जाहीर केले होते. मात्र, काल आम्ही केलेल्या दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करू म्हणून उल्लेख केला आहे. त्यासोबतच सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ लागणार असल्याचे सांगितले. चार पैकी दोन मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. राहिलेल्या दोन मागण्यांची येत्या आठ-पंधरा दिवसात अंमलबजावणी सरकारने करावी, असे जरांगे यावेळी म्हणाले.