म्हैसूर : News Network
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने २०२२ च्या बॅचमधील ४०० ट्रेनी प्रशिक्षणार्थी कर्मचा-यांना काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता इन्फोसिसवर सर्व स्तरातून आरोप होत आहेत. दरम्यान, यावर इन्फोसिसने प्रतिक्रिया दिली आहे. मूल्यांकनात तीन वेळा अपयश आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कंपनीकडून दिली आहे. ही प्रक्रिया दोन दशकांपासून सुरू आहे आणि या अंतर्गत प्रशिक्षणार्थीला तीन प्रयत्नांमध्ये असेसमेंट उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

सर्व प्रशिक्षणार्थींना असेसमेंट उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी दिल्या जातात आणि जर ते अयशस्वी झाले तर ते कंपनीत पुढे काम करु शकत नाहीत, असे इन्फोसिसने सांगितले.
इन्फोसिसमधील कर्मचा-यांना काढून टाकण्याचे हे प्रकरण म्हैसूर कॅम्पसचे आहे. हे कर्मचारी सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीत रुजू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया अतिशय पद्धतशीर पद्धतीने करण्यात आली. सकाळी ९:३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॅपटॉपसह ५०-५० जणांच्या बॅचमध्ये बोलावण्यात आले. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि बाउन्सर देखील तिथे उपस्थित होते.