वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अदानी समूहाविरुद्ध करण्यात आलेली चौकशी संशयाच्या भोव-यात अडकली आहे. अमेरिकेच्या सहा खासदारांनी नवीन अॅटर्नी जनरल पामेला बोंडी यांना पत्र लिहून या कारवाईच्या चौकशीची मागणी केली आहे. खासदारांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासावर भर दिला.

लान्स गुडन, पॅट फॅलन, माईक हॅरिडोपोलोस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमन्स (चतुर्थ) आणि ब्रायन बेबिन या खासदारांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, बायडेन प्रशासनाच्या काही निर्णयांचा भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार असून, दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून मजबूत राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध आहेत, जे आता धोक्यात येऊ शकतात.
अदानी समूहाविरुद्ध यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे)ची कारवाई भारतातील अधिका-यांना लाच देण्याच्या कथित कटावर आधारित आहे. मुळात हे प्रकरण भारताशी संबंधित होते आणि तिथेच ते निकाली काढायला हवे होते. परंतु बायडेन प्रशासनाने अमेरिकी हिताच्या विरोधात जाऊन कारवाई केली, असा आरोप खासदारांनी केला आहे.