विश्लेषण । श्रीपाद सबनीस
जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली असून दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे….

भ्रष्टाचाराचे आरोप
मागील पाच वर्षांत आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपच्या प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. तसेच या प्रकरणात त्यांना तुरुंगवासाचा सामना करावा लागला. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला. तसेच भ्रष्टाचारविरोधी पक्ष अशी असलेली आपची प्रतिमा धुळीस मिळाली. त्याशिवाय यमुना नदीची स्वच्छता, दिल्लीत पॅरिसच्या दर्जाचे रस्ते आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. मात्र ही आश्वासने पूर्ण होऊ शकली नाहीत.
नेतृत्वामधील अस्थैर्य
अरविंद केजरीवाल यांना गतवर्षी झालेली अटक आणि नंतर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेतृत्व अस्थिर झाले. आतिशी मार्लेट यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षाच्या नेतृत्वाबाबतची अनिश्चितता संपली नव्हती. एवढंच नाही तर भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून नेतृत्व प्रस्थापित करणा-या केजरीवाल यांची विश्वासार्हता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कमालीची डागाळली. त्याचा फटका आपला या निवडणुकीत बसला.
काँग्रेसने फोडलेली मते
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाची मते मोठ्या प्रमाणावर फोडून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे जबरदस्त नुकसान केले. २०१३ नंतर काँग्रेसची व्होटबँक आम आदमी पक्षाकडे सरकली होती. मात्र यावेळी काँग्रेसने आपची काही मते आपल्याकडे खेचल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला.
‘आप’मधील अंतर्कलह
आम आदमी पक्षामध्ये असलेले अंतर्कलह आणि त्यामधून प्रमुख नेत्यांनी दिलेले राजीनामे हे देखील आपच्या आज झालेल्या या पराभवाचे एक कारण ठरले. गतवर्षी झालेले स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण, तसेच कैलाश गहलोत, राजकुमार आनंद यांच्यासारख्या काही नेत्यांनी ऐनवेळी दिलेला राजीनामा यामुळे पक्षाचा संघटनात्मक कमकुवतपणा उघड झाला.
आरोपांचा जनमानसावर प्रभाव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विरोधी पक्षांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आरोपांची मालिका लावली होती. आप आणि केजरीवाल यांचा कथित मद्य घोटाळ्यात असलेला सहभाग, केजरीवाल यांचे आलिशान निवासस्थान आदिंवरून भाजपाने आपची कोंडी केली होती. तर काँग्रेसनेही आपविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. तसेच फ्रीबिजच्या घोषणाही ‘आप’ला मतदान मिळवून देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आपला मोठा फटका बसला.