नवी दिल्ली : khabarbat News Network
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी मात्र विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव ‘आप’ला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयातील चित्र आहे.

‘आप’च्या मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आतून बंद करण्यात आले असून कोणालाच प्रवेश दिला जात नाही. या कार्यालयात काम करणा-या महिलेला देखील आतमध्ये घेतलेले नाही. तिला आतमध्ये घेण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांत आप मागे पडल्याचे दिसताच आपच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. आता केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे समजल्यानंतर गेटच बंद करून घेण्यात आले आहे.
हे पण वाचा… ‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….
‘आप’च्या वरिष्ठ पातळीवरचे बहुतांश सर्व नेते पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना ३१८६ मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून ‘आप’चे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे.
केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केली. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीने प्रवास करणे, सुरक्षा घेण्यास नकार देणे, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते. पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. जनतेने त्यांना स्वत:चा नेता म्हणून निवडले पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वत:ची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यात दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, भाजपविरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणे, या गोष्टींना जनता कंटाळली होती. याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रुपांतरीत झाला.