कराची : News Network
Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकपदी (संचालन) पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket Board) बोर्डाने हिना मुन्नवर (Hina Munawar) महिला या पोलिस अधिका-याची निवड केली. नेमकी येथेच पाकिस्तानच्या खेळाडूंची अडचण झाली आहे. धार्मिक कारणांमुळे पुरुषांमध्ये स्त्रिया मिसळत नसल्याचे कारण देत खेळाडूंनी त्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान क्रिकेट संघासोबत नियुक्ती होण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. याआधी त्या पाकच्या महिला क्रिकेट संघासोबत विदेश दौ-यावर जाऊन आल्या आहेत.

पाकिस्तानच्या पुरुष राष्ट्रीय संघात त्यांच्या नियुक्तीमुळे गंभीर चिंता निर्माण झाली असून एक महिला पुरुषांच्या क्रमवारीत कशी असू शकते, यावरून कुरकुर सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या संघांमध्ये फिजिओ, मीडिया मॅनेजर किंवा कोचिंग स्टाफमध्ये महिला असणे ही सामान्य बाब आहे; परंतु पाकिस्तान क्रिकेटने अशा नियुक्तीला याआधी फारसे प्राधान्य दिलेले नाही. संघातील काही खेळाडू धार्मिकवृत्तीचे कट्टरतेने पालन करीत असल्याने ते महिलांसोबत संवाद साधत नाहीत. महिला अधिकारी संघात असल्याने त्यांच्याशी संवाद कसा साधायचा, ही त्यांची मुख्य अडचण आहे. महिला सोबत असल्याने वैयक्तिक विषय आणि चर्चा करण्यावरही बंधने येणार आहेत.
सुरक्षा कामगिरीमुळे बढती
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तान संघ सरावात व्यस्त आहे. ८ फेब्रुवारीपासून त्यांना तिरंगी मालिका खेळायची आहे. दरम्यान, मुन्नवर यांनी आपली जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू त्यांची नियुक्ती कशा प्रकारे स्वीकारतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुन्नवर यांना क्रिकेटचे फारसे ज्ञान नव्हते; पण त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कामाच्या पद्धतीवर खुश होऊन (PCB) पीसीबीने त्यांना संघ व्यवस्थापक म्हणून बढती दिली.