बुलढाणा : प्रतिनिधी
बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास १५ गावांत महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक दिवसांपासून याचे कारण समोर येत नव्हते. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तातील आणि केसात सेलेनियम या जड धातूचे प्रमाण हे याचे प्रमुख कारण असल्याचे कळते. हे सेलेनियम इथले नागरिक जो गहू वापरतात त्यातून त्यांच्या शरीरात भिनल्याचा अंदाज लावला जात आहे.

या सेलेनियममुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने केंद्राच्या एका विशेष पथकाने खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणी केली. दरम्यान गव्हासह तांदूळामध्ये धान्य टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल जास्त प्रमाणात आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर गोदामातील धान्याची उचल न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Click and Read more….. देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट; खडसेंचा परतीचा मार्ग खुला?
शेगाव तालुक्यातील केस गळती होत असलेल्या १५ गावात आयसीएमआरच्या प्रतिनिधींचे पथक आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे पुन्हा नमुने घेतले जात आहेत. यामुळे मात्र या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते म्हणाले की, ज्या लोकांच्या रक्ताचे नमुने एक महिन्यापूर्वी घेतले होते त्याच नागरिकांचे पुन्हा रक्ताचे नमुने तपासण्यात येत आहेत. त्यात काही सुधारणा झाली का, हे तपासून बघणार आहोत. हे नमुने आयसीएमआरच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली घेण्यात येत आहे.
सेलेनियम म्हणजे नेमकं काय?
– सेलेनियम हा एक जड धातू आहे.
– मानवी शरीराला जेवणातून किंवा पाण्यातून सेलेनियम मिळते.
– शरीरात जर सेलेनियम कमी प्रमाणात असेल तर केसांची वाढ झपाट्याने होते.
– सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यास केसगळती होते.
– पालक, मांसाहारी पदार्थ, मांस, गहू अशा पदार्थात सेलेनियम जास्त असते.