बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस चांगलेच चर्चेत आले. नवे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी सुत्रे हाती घेताच नवीन बदल केले आहेत. आता अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू माफियांना मदत करणा-या पोलिसांवर त्यांनी कारवाई केली.

अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी आरोपींसोबत साटे लोटे करणा-या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते. पण तरीही वाळूसह वाहन ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला. या बाबी गुन्हेगारांना मदत करण्यासारख्या ठरल्या. या अनुषंगाने पोलीस अधिक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.