चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार
मृत भाविकांच्या कुटूंबियांना २५ लाखाची भरपाई
प्रयागराज : विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा असून बुधवारी मौनी अमावस्यानिमित्त शाही स्रान होतं. मात्र यावेळी मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. सुरुवातीला या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मात्र आता महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयजी अर्थात उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी चेंगराचेंगरीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दुर्घटनेच्या १६ तासांनी अधिका-यांनी मृतांचा अधिकृत आकडा सांगितला आहे.

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ९० भाविक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींना मेडिकल कॉलेजमध्येही दाखल करण्यात आलं आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ३० जणांपैकी २५ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली आहे. पाच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
हे पण वाचा : १९५४ च्या चेंगराचेंगरीत हत्ती उधळला, ८०० भाविक दगावले; १००० जखमी
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभच्या या दुर्घटनेनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय समिती या घटनेची चौकशी करणार आहे. चेंगराचेंगरीची घटना बॅरिकेट्स तुटल्यामुळे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे हे बॅरिकेट्स तुटून हा अपघात झाल्याची माहिती त्यांनी दिली. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे.