पुणे/मुंबई : विशेष प्रतिनिधी
डिजिटल भारतात सध्या ‘एआय’ म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्येक क्षेत्रात गतीमानता आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी देखील ‘एआय’ तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे समोर आले आहे.

बारामतीमध्ये ‘एआय’चा वापर करुन ऊसाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, भारत दौ-यावर असलेल्या मायक्रोसॉप्ट कंपनीचे चेअरमन सत्या नंडेला यांनी बारामतीला भेट देऊन विशेष कौतुक केले. बारामतीमधील शेतकरी सुरेश जगताप यांनी अलीकडेच ऊस उत्पादनासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी, बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) चे वैज्ञानिक आणि मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली. सत्या नाडेला यांनी या ऊस शेतीत केलेल्या प्रयोगाची दखल घेत बारामतीचे विशेष कौतुक केले. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करुन सत्या नाडेला यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील १००० शेतक-यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन करत आहे. दरम्यान, १६ ते २० जानेवारी दरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे कृषी प्रदर्शन आयोजित आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये भविष्यातील शेती कशी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लागवड केलेला ऊस आणि इतर पिके याच्े प्रात्यक्षिक शेतक-यांना बघायला मिळणार आहेत.
सत्या नाडेलांचे ट्विट : बारामती येथील ‘एडीटी’ टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या ‘एआय’ टूल्सचा वापर करून शेतक-यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत, असे ट्विट सत्या नाडेला यांनी केले होते.