khabarbat News Network
टाइम ट्रॅव्हलचे किस्से चित्रपट आणि मालिकांमधून पाहिले असले तरी प्रत्यक्षात असे घडणे अशक्य असल्याची जाणीव सर्वांना आहे. मात्र अशी एक घटना समोर आली आहे. जी एखाद्या टाइम ट्रॅव्हलसारखी वाटू शकते.

कॅथे पॅसिफिकचे विमान सीएक्स ८८० ने १ जानेवारी २०२५ रोजी हाँगकाँग येथून उड्डाण केले आणि हे विमान ३१ डिसेंबर २०२४ रोजी अमेरिकेमधील लॉस एंजलिस येथे उतरले. ऐकण्यास धक्कादायक वाटत असले तरी हे खरे आहे.
इंटरनॅशनल डेटलाईन ही एक काल्पनिक रेषा आहे. ती पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी आहे. ही रेषा पृथ्वीवरील दोन वेगवेगळ्या तारखांना विभाजित करते. जेव्हा विमान या रेषेला पार करते, तेव्हा तारीख बदलते. पश्चिमेकडे जाताना तारीख एक दिवस पुढे जाते. तर पूर्वेकडे येताना तारीख एक दिवस मागे जाते.
समजा तुम्ही १ जानेवारी रोजी सकाळी हाँगकाँग येथून विमान पकडलं आणि हे विमान इंटरनॅशनल डेटलाईन पार करून लॉस एंजेलिसला पोहोचलं तर तिथे तारीख ही ३१ डिसेंबर असेल. त्यामुळे वेळेच्या मागे गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. हे सर्व इंटरनॅशनल डेटलाइनमुळे घडते.
इंटरनॅशनल डेटलाइन जगभरात तारीख निश्चित करण्यास मदत करते. मात्र त्याला काही कायदेशीर दर्जा नाही. ही रेषा सरळ नाही, तर देश आणि भूगोलानुसार वळणदार आहे. उदाहरणच द्यायचे तर ती रशिया आणि अलास्कादरम्यान झिगझॅग करते.