नवी दिल्ली : khabarbat News Network
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सत्ताधारी पक्षाकडून दिली जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत माहिती देताना म्हणाल्या, विजय मल्ल्याची संपत्ती विकून विविध बँकांना १४ हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदी याची संपत्ती विकून १,०५३ कोटी रुपये देखील बँकांना देण्यात आले. या दोन्हीसह विविध घोटाळ्यात अडकलेल्या रकमेसह एकूण २२,२८० कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत.

ईडी आणि बँकांनी मुंबईच्या विशेष न्यायालयात धाव घेतली. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीच्या संपत्तीच्या विक्रीच्या परवानगीच्या मागणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले होते. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता.
विशेष कोर्टाने ईडीला मेहुल चोक्सीच्या जप्त करण्यात आलेल्या २,२५६ कोटींच्या मालमत्तेचे मुल्यांकन आणि आणि लिलाव करण्यास परवानगी दिली होती. विक्रीनंतर मिळणारी रक्कम मुदत ठेवीच्या रुपात पीएनबी इतर ज्यांनी कर्ज दिलेले असेल त्यांच्या खात्यात ठेवण्याचे आदेश दिले होते.
विजय मल्याच्या यूनाएटेड स्पिरिट या कंपनीची विक्री झाली आहे. तर, किंगफिशर एअलाईन देखील बंद झाली आहे. विजय मल्ल्या भारतातून ९ हजार कोटी रुपये घेत देश सोडून गेले होते. विजय मल्ल्याने २००३ मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरु केली होती. किंगफिशरला सर्वात मोठा ब्रँड बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. यासाठी एअर डेक्कन कंपनी १२०० कोटी रुपयांना विकत घेण्यात आली होती. एअर डेक्कन पाठोपाठ किंगफिशर एअरलाइन्स देखील बंद झाली.