लातूर : प्रतिनिधी
तब्बल १२ वर्षातून एकदा आयोजित होणारा महाकुंभ यंदा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणा-या या महाकुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक पोहोचणार आहेत. १२ वर्षातून एकदा धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व असलेला हा मेळा आयोजित केला जातो. या महाकुंभच्या महायोगात तुम्हीही लग्नाचा करण्याचा विचार करत असाल तर उत्तम ठरणार आहे. कारण लग्नासारखे शुभ कार्य एखाद्या शुभ मुहूर्तावर जितके होईल, तितकेच त्याचे सकारात्मक परिणाम भावी आयुष्यात दिसून येतात. जर तुम्हाला तुमच्या लग्नाचा क्षण संस्मरणीय बनवायचा असेल, तर यावेळी तुम्ही महाकुंभाच्या महायोगात विवाह करू शकता, त्यासाठी महाकुंभ २०२५ मध्ये लग्नासाठी उपलब्ध शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे….

हिंदू दिनदर्शिकेनुसार, महाकुंभ २०२५ हा १३ जानेवारीपासून सुरू होईल आणि २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालेल. या दरम्यान अनेक शुभ काळ आणि मुहूर्त येतील. यादरम्यान शाहीस्रानही होणार आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैनमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ सर्वात भव्य मानला जातो. महाकुंभमेळ्यात स्रानाला खूप महत्त्व आहे.
विवाहासाठी शुभ काळ
१६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, २६, २७ जानेवारी तसेच २, ३, ६, ७, १८,१९, २१, २३, २५ फेब्रुवारी.
पहिले शाही स्रान कधी?
महाकुंभाचे पहिले शाही स्रान सोमवार, १३ जानेवारी, म्हणजेच पौष पौर्णिमेला, कुंभमेळ्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी होईल. पौष पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.