नागपूर : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाच्या वाट्याला कोणतं खाते जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, उद्या (शनिवार) ऐवजी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ती म्हणजे समोर आलेल्या माहितीप्रमाणे रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, यासाठी नागपुरात घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.