khabarbat News Network

मुंबई : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळालेल्या भरीव यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांचा पक्षालाही झाला. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागल्या. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असे फडणवीस यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.