Khabarbat News Network

मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून नाराज एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कसे राजी केले, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय ठरली आहे. गृह, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी समझोता केला का? याबाबतची ही इनसाईड स्टोरी…
हे पण वाचा : ‘Bitcoin’ पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पार!
दिल्लीतील भेटीनंतर एकनाथ शिंदे आजारी पडले. एकनाथ शिंदे दरेगावात असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची विचारपूस केली आणि मुंबईत या… आपण बोलू असं सांगितलं. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंना विनंती केली की, तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. आपण एकत्र निवडणूक लढली. आपण अडीच वर्षे एकत्र काम केलं. तुमच्या मागण्या आमच्यासमोर आहेत. आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढू. मी आणि फक्त अजित पवारांनी शपथ घेतल्यास ते योग्य दिसणार नाही.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा खात्यांसंदर्भात चर्चा झाली. यामध्ये गृह खातं हा विषय होताच, पण गृह खातं भाजप सोडायला तयार नव्हतं. त्यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. याशिवाय एकनाथ शिंदेंना सन्मानपूर्वक मंत्रिपदं दिली जातील, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना दिलं. या सकारात्मक चर्चेंनंतर एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. पण आमचा पक्ष आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीत आमच्या पक्षाला बळ मिळावं, यासाठी योग्य तो निर्णय घेतला जावा, असंही त्यांनी सांगितले. यावर देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक शब्द दिला आणिं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्यास राजी झाले.