वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फरन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेळी बिटकॉईन ६७ हजार डॉलरच्या घरात पोहचला होता.
२० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यापूर्वीच क्रिप्टोकरन्सीत बिटकॉईनने नवीन इतिहास रचला. बिटकॉईनची किंमत १ लाख डॉलरच्या घरात पोहचली.
कॉईन मार्केटच्या आकडेवारीनुसार, बिटकॉईनचा भाव ७ टक्क्यांच्या तेजीसह १०२,६५६.६५ डॉलरवर व्यापार करत आहे. व्यापार सत्रा दरम्यान बिटकॉईनची किंमत १०३,९००.४७ डॉलरवर पोहचली आहे. बिटकॉईनचा भाव लवकरच १.२५ लाख डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी दिनी २० जानेवारी २०२५ रोजी बिटकॉईन हा ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतो.
गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉईनने गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना १४५ टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. या वर्षाअखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.