सिओल : वृत्तसंस्था
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा निर्णय अवघ्या ६ तासांच्या आत मागे घेतला. ‘कोरिया हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार, देशातील नागरिकांची निदर्शने आणि लोकक्षोभाचा प्रचंड उद्रेक पाहता राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी सकाळी (४ डिसेंबर २०२४) त्यांचा आदेश मागे घेत नॅशनल असेब्लींची विनंती मान्य केली. मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती हेही त्यांनी मान्य केलं.
मार्शल लॉ लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयानंतर देशभरात बराच गदारोळ झाला. या घोषणेनंतर सेना, विरोधी पक्षाचे खासदार आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. जनतेचा प्रचंड विरोध आणि रोष पाहून अखेर राष्ट्राध्यक्षांना त्यांचा आदेश मागे घ्यावा लागला.
नॅशनल असेंब्लीमध्ये उपस्थित असलेल्या १९० खासदारांनी राष्ट्राध्यक्ष यून यांच्या मार्शल लॉच्या घोषणेच्या विरोधात मतदान केले. कोरियाच्या मुख्य विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीसह उदारमतवादी पक्षाने यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये बहुतांश जागा जिंकल्या आहेत.
दुसरीकडे मार्शल लॉ मागे घेतल्यानंतर तैनात सैनिकही आपापल्या तळावर परतले. दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ४:२२ पर्यंत सर्व सैन्य त्यांच्या तळांवर परत आले.