मुंबई : विशेष प्रतिनिधी
Maharashtra Election 2024 | महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तणाव कायम आहे. त्यामुळे उमेदवार यादीला देखील विलंब होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे, याचा पुरेसा अंदाज त्यांनाही आलेला नाही, असे सद्याच्या घटनाक्रमावरून दिसून येते.
बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी म्हटलं की, आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू. ठाकरेंच्या मनात काय आहे, पवारांना काय वाटतं हे या बैठकीत समजून घेतलं, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये एकाहून एक मोठे भूकंप घडले आहेत. त्यात राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन गटात वाटल्या गेली. सध्या जागा वाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली. काही जागांवर मतभेद असले तरी ते सामोपचाराने सोडवण्याचे तंत्र आणि मंत्र त्यांनी अवलंबले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तीव्र मतभेद समोर आलेले आहेत.
मतभेदांमुळे आघाडी तुटणार : उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या प्रचंड मोठे मतभेद झालेले आहेत. काही तासातच महाविकास आघाडी तुटल्याचे महाराष्ट्र बघेल, असा दावा त्यांनी केला.