Helicopter land in Flood water | बिहारमधील पूर परिस्थिती अद्याप कायम आहे. राज्यातील विविध भागांमधील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. बुधवारी मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले. सध्या बचावकार्य सुरू आहे. औरईच्या मधुबन बेसीमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये ४ जण उपस्थित होते. हे हेलिकॉप्टर बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी गरजू वस्तू आणि इतर साहित्य घेऊन जात होते. अपघातानंतर तपास पथक पायलट आणि उपस्थित असलेल्या इतर जवानांची चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. हेलिकॉप्टरला अचानक आग लागल्याने पायलटने हेलिकॉप्टर पाण्याच्या दिशेने नेल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताबाबत लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टर पाण्यात उतरवले. हवाई दलाचे सर्व कर्मचारी आणि पायलट सुरक्षित आहेत.