बीड | khabarbat News Network
जात पंचायतीच्या न्यायाचा अजब प्रकार समोर आला आहे. सास-याने प्रेम विवाह केला, याची शिक्षा सुनेला मिळाली आहे. जात पंचायतीने महिलेला शिक्षा म्हणून तिच्या सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत केले आहे. बीडमधील आष्टीमध्ये हा सगळा प्रकार घडला असून या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालन फुलमाळी पीडित महिलेचे नाव आहे. तर नरसु फुलमाळी असे या महिलेच्या सास-यांचे नाव आहे. नरसु फुलमाळी हे तीरमाली समाजाचे आहेत. नरसु यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र याबाबत त्यांना समाजाची परवानगी घेतली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने नरसु फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
मात्र अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड त्यांनी भरला नाही. त्यानंतर जात पंचायतीने मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.