khabarbat News Network
नवी दिल्ली | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले.
दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?
केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे.