गाबोरोने : बोत्सवाना येथील एका खाणीतून तब्बल २,४९२ कॅरेटचा हिरा काढण्यात आला आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड कॉर्प या कंपनीने कारोवे येथील खाणीतून हा हिरा उत्खनन करुन काढला.
गेल्या १०० वर्षांत आढळलेला हा सर्वात मोठा हिरा ठरला आहे. बोत्सवाना हा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे. अलिकडच्या काळातील सर्वच सर्वात मोठे हिरे याच देशात सापडले आहेत.
– १,७५८ कॅरेटचा ‘सेवेलो’ हा हिरा याच खाणीत २०१९ मध्ये सापडला होता. तो आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा हिरा मानला गेला होता. फ्रान्सच्या लुईस वुईटन या कंपनीने तो खरेदी केला होता.
– १,१११ कॅरेटचा ‘लेसेदी ला रोना’ हा हिरा देखील याच खाणीतून काढण्यात आला होता. एका ब्रिटीश सराफ व्यावसायिकाने तो ५.३ कोटी डॉलरला २०१७ मध्ये खरेदी केला होता.
– १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून ३,१०६ कॅरेटचा हिरा काढण्यात आला होता. त्या हि-याचे नाव कलिनन असे होते. त्याचे अनेक तुकडे करण्यात आले होते. त्यांचे पैलू पाडून ते हिरे ब्रिटीश शाही दागिन्यांमध्ये लावण्यात आलेले आहेत.