पिथौरागड | हिमालयामध्ये हिंदू धर्माशी संबंधित अशी अनेक महत्त्वाची स्थळं आहेत. त्यापैकीच एक आहे, ओम पर्वत. ज्या प्रमाणे अमरनाथ येथील गुहांमध्ये बर्फापासून नैसर्गिकरीत्या शिवल्ािंग निर्माण होते त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात ओम पर्वत या ठिकाणी दरवर्षी ॐ अशी आकृती तयार होते. ओम पर्वत हा चीनच्या सीमेला लागून असलेल्या लिपुलेख दरीजवळ आहे. तसेच ॐ अशी आकृती तयार होत असल्याने तो ओम पर्वत या नावाने प्रसिद्ध आहे.
मात्र आता या ओम पर्वताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओम पर्वतावर नैसर्गिकरीत्या तयार होणारी ॐ ही आकृती यावेळी तयार झालेली नाही. ज्ञात इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे. दरम्यान, ही आकृती न बनण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. त्याबरोबरच पर्यटन वाढल्याने येथे रस्ते बांधले जात आहेत. पर्यटकांच्या सुविधेसाठी अनेक बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे हिमालयातील पर्यावरण आणि हवामानावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
ओम पर्वत पिथौरागड जिल्ह्यापासून १७० किमी दूर अंतरावरील नाभीढांग येथे स्थित आहे. येथील निसर्गाचा चमत्कार भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकतो. तसेच येथे दरवर्षी बर्फामुळे ओम ही आकृती कशी काय तयार होते, असा प्रश्न पडतो. हे स्थान शिवशक्तीच्या आशीर्वादाची साक्ष आहे. ओम पर्वताच्या धार्मिक आणि पौराणिक महत्त्वाचा उल्लेख महाभारत, रामायण आणि काही पुराणांमध्ये सापडतो.