आज १ ऑगस्टपासून ‘फास्टॅग’च्या (FASTag) नियमांमध्ये बदल होत आहेत. यासाठी वाहन मालकांना त्यांच्या फास्टॅग खात्यात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे त्यांना टोल प्लाझावर कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल.

फास्टॅगसाठी सर्वात मोठा नियम म्हणजे तुम्हाला तुमचा ‘केवायसी’ (KYC)अपडेट करावा लागेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नवीन नियमांनुसार, पाच वर्षे किंवा त्याहून अधिक जुनी फास्टॅग खाती बदलण्याची गरज आहे. यासाठी, फास्टॅग युजर्सना त्यांच्या खात्याची तारीख तपासावी लागेल आणि आवश्यक असल्यास प्राधिकरणाकडून ती बदलून घ्यावी लागेल.
याशिवाय, तीन वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅग खात्यांसाठीही केवायसी करणे आवश्यक आहे. फास्टॅग सेवेद्वारे केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. युजर्स आणि कंपन्या त्यांच्या फास्टॅग खात्याची केवायसी प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करू शकतात. पण, १ ऑगस्टपासून तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्ट केला जाईल.
‘फास्टॅग’सह फोन नंबर लिंक करा
फास्टॅगच्या नियमांमध्ये एक बदल म्हणजे, तुमचे फास्टॅग (FASTag)खाते तुमच्या वाहनाशी आणि वाहन मालकाच्या फोन नंबरशी जोडलेले असावे. एप्रिलपासून एक फास्टॅग अकाऊंट एका वाहनासाठी वापरला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच वाहन नोंदणी क्रमांकासह खाते लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनाचे पुढील आणि बाजूचे फोटोही पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत. जे लोक १ ऑगस्ट किंवा त्यानंतर नवीन वाहन खरेदी करत आहेत, त्यांनी वाहन खरेदी केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्यांचा नोंदणी क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.