Khabarbat News Network
संभाजीनगर : कोणत्या ना कोणत्या कारणाने बीडचे नाव जसे सतत चर्चेत असते, तसेच कुठल्या ना कुठल्या प्रकरणाशी बीड (beed) कनेक्शन समोर येत असते. आता वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे एकूणच प्रकरण चव्हाट्यावर आणून देशभरात पोहोचवण्यात देखील बीड कनेक्शन समोर आले. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सोबतच केंद्र सरकार देखील हादरले आहे.

देशभर खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण सर्वांसमोर आले तरी कसे? त्यात बीडचे कनेक्शन काय? हे समजून घ्यायला हवे. सोशल मिडीयाची ताकद ओळखून असलेल्या वैभव कोकाट या तरूणाला सुरूवातीच्या काळात काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या (Puja Khedkar) पूजा खेडकरांच्या ऑडीचे प्रकरण इम्पॅक्टफुल ठरू शकते हे त्याने हेरले आणि त्या अनुषंगाने ट्विट केले.
निवृत्त सनदी अधिका-याची मुलगी असलेली (pooja khedkar) पूजा खेडकर कोण आहे? हे काही दिवसांपूर्वी कोणालाच माहीत नव्हते. त्यासंदर्भात वैभव कोकाट म्हणतो, ‘पूजा खेडकरसंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला. त्याचे तपशील वाचनात आल्यावर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा करु शकतो? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर वैभवने ६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची माहिती फोटोसह ‘एक्स’वर टाकली. त्यानंतर काही वेळेत ती व्हायरल झाली.
वैभवने पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, एका ट्विटमध्ये मोठी ताकद असते, आपण निर्भिडपणे लिहिले पाहिजे. काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरे बोलले पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला.