– जालना-राजुर रोडवरील तुपेवाडीत घडली घटना
– दुचाकीला वाचवताना काळीपिवळी विहिरीत
जालना – भोकरदन । राम पारवे – महेश देशपांडे
वारक-यांना घेऊन जाणारी भरधाव काळी-पिवळी जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारात गुरूवारी (१८ जुलै) सायंकाळी ५ वाजता विहिरीत कोसळली. या अपघातात ७ वारकरी मृत्युमुखी पडले, तर ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.
दुचाकीला वाचवताना काळीपिवळी विहीरीत कोसळली. या दुर्घटनेत सात वारकरी ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना ते राजुर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे ही घटना घडली.
भोकरदन तालुक्यातील राजुर शिवारातील चनेगाव, तुपेवाडी, राजुर येथील भाविक हे पंढरपुर येथे पंधरा दिवसांपूर्वी दिडींत पायी वारीने गेले होते. गुरूवारी ते परतीच्या मार्गावर होते. पंढरपूर येथून जालना बसस्थानकावर दुपारच्या वेळी एसटीने पोहोचले होते. पंढरपुरच्या यात्रेमुळे बसेसची संख्या कमी असल्याने त्यांनी जालना ते राजुर मार्गावर चालणा-या काळी पिवळी (एम.एच.२१-३८५०) या वाहनाने चार वाजेदरम्यान राजुरकडे निघाले होते.
दरम्यान, आपल्या गावापासून अवघ्या १० ते १२ किमी अंतरावर असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक वळसा घेतला. दुचाकी थेट आडवी झाल्याने चालकाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काळीपिवळी रोडच्या बाजुला पाच फुट अंतरावर असलेल्या विहीरीकडे वळाली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कठडे नसलेल्या विहीरीत जाऊन कोसळली.
ही घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठुन काही मृतदेह तसेच प्रवाशांना विहीरीबाहेर काढले. तासाभरानंतर क्रेनच्या सहाय्याने काळीपिवळी बाहेर काढण्यात आली. काहींना राजुर येथील रूग्णालयात तर काहींना जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
प्रल्हाद महाजन, प्रल्हाद बिटले, नंदा तायडे, नारायण नेहाळ, चंद्रभागाबाई घुगे (सर्व रा. चनेगाव ता. बदनापुर), ताराबाई भगवान मालसुरे (रा. तपोवन ता. भोकरदन) असे मृत्यू झालेल्या भाविकांची नावे तर रंजना कांबळे (रा. खामखेडा) महिला प्रवाशांचा यात समावेश आहे.
सात जण गंभीर जखमी
भगवान मालुसरे (रा. तपोवन), आर. पी. तायडे, सखुबाई प्रल्हाद महाजन (दोघे रा. चनेगाव ता. बदनापुर) बाबुराव हिवाळे रा. मानदेऊळगाव, हिम्मत चव्हाण रा. तपोवन तांडा, ताराबाई गुळमकर रा. चनेगाव, अशोक पुंगळे (रा. राजुर) असे गंभीर झालेल्यांची नावे आहेत.